नाशिक जिल्ह्यात उद्या रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू मास्कचा वापर न केल्यास होणार एक हजार रुपयांचा दंड : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक जिल्ह्यात उद्या रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू
मास्कचा वापर न केल्यास होणार एक हजार रुपयांचा दंड : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक दिनांक 21 (जिमाका वृत्तसेवा) - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्या रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तसेच सर्वांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील कोविड 19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भुजबळ फार्म येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनंत पवार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आवेश पल्लोड उपस्थित होते.
जिल्ह्यातील मृत्यूदर स्थिर; परंतू वाढती रुग्णसंख्या धोकादायक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थितीची माहिती देताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, गेल्या चार ते पाच दिवसांत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये 16 ते 20 फेब्रुवारी या पाच दिवसात शहरात 410, ग्रामीण भागात 77 आणि मालेगाव येथे 41 असे एकूण 534 रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर स्थिर असला तरी पंधरा दिवसात 1731 रुग्ण वाढणे हे सर्वांसाठी धोकादायक आहे. तसेच एकूण रुग्णांच्या 80 ते 90 टक्के रुग्ण गृह विलगीकरणात असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
ग्रामीण भागाचा विचार करता निफाड व दिंडोरी या तालुक्यात दुपटीने रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध आणून गर्दीचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत योग्यती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी पालकमंत्री यांना दिली.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून लग्न समारंभाचे प्रमाण देखील वाढले असल्याने त्याचा विपरीत परिणाम म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लग्न समारंभासाठी पोलिस यंत्रणेकडून एका वेळी फक्त 100 व्यक्तिंनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच गोरज मुहूर्तावरील लग्न समारंभात होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेवून, मंडप व लान्सच्या मालकांना येत्या तीन चार दिवसांनंतर होणाऱ्या गोरज मुहूर्तावरील लग्नांसाठी परवानगी देण्यात येवू नये. त्याऐवजी दुपारीच लग्न सोहळा संपन्न करून सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणेने दिलेल्या परवानगीनुसार लग्न समारंभ होत आहेत किंवा कसे याबाबत महानगरपालिका व पोलिस यंत्रणामार्फत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांना 28 फेब्रुवारीपर्यंत लसीकरण
जिल्ह्यातील कोरोना काळात फ्रंटलाईनवर राहून काम करणारे आरोग्य, पोलिस आणि महसूल यंत्रणेतील 69 हजारांपैकी 40 हजार अधिकारी कर्मचारी यांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित अधिकारी कर्मचारी यांनी 28 फेब्रुवारी पर्यंत पुढाकार घेवून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देखील पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात अजून साधारण 80 हजार लसचा साठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मास्क, सॅनिटायझ आणि सुरक्षित अंतराचा नियमितपणे वापर करून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. येत्या आठ दिवसात परिस्थिती नियंत्रणात नाही आली तर यापेक्षा कठोर निर्बंध लादण्याबाबत निर्णय घेण्यात येतील, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME