मंत्रालयात राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
मंत्रालयात राज्यस्तरी अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
मुंबई, दि. 26 : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने, मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज मंत्रालयात मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, उद्योगमंत्री यांच्या विशेष कार्य अधिकारी चित्रा देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी , पराग गाडगीळ, निर्मिती नामजोशी, समीर बापट यावेळी उपस्थित होते. जिल्हास्तरीय फेरीत राज्यभरातून 1760 स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांतून आणि प्रत्येक वयोगटातून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी एकूण 164 स्पर्धकांची निवड राज्यस्तरीय परीक्षणासाठी गटनिहाय झाली. 7 गटात विभागून विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रत्येक गटात प्रथम क्रमांकांना 11 हजार रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, द्वितीय क्रमांक 7 हजार रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, तृतीय क्रमांकसाठी 5 हजार रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे व अंकनादाचा संच, कुपन ही पारितोषिके दिली गेली.
बालगटासाठी पहिला पुरस्कार विराज खामकर, दुसऱ्या आणि तिसऱ्या या गटासाठी वेदिका ओक, चौथी आणि पाचवीच्या गटासाठी अर्णव कुलकर्णी सहावी आणि सातवीच्या गटासाठी दामोदर चव्हाण, आठवी ते दहावीच्या गटासाठी वेदिका जरीपटके, खुल्या गटातून दिनेश पवार यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
गणिताची आकडेमोड करताना अंक नाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल, हा संस्थेचा उद्देश असून अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. गणिताशी मैत्री करुन विज्ञान तंत्रज्ञानाकडे वळविणे हा या संस्थेचा उद्देश असल्याने, त्यासाठी अंकनादतर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले, असे मंदार नामजोशी यांनी सांगितले. तसेच या स्पर्धेमुळे मुलांच्या बौद्धिक वाढीस चालना मिळेल, असे सहसचिव श्री. गवादे यांनी सांगितले.
यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचीही भेट विजेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतली. अंकनाद ' च्या उपक्रमाचे आणि विजेत्यांचे त्यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME