दाभाडी गावात आज पाण्याची गंगा आली; यापुढे विकास गंगा वाहील : कृषिमंत्री दादाजी भुसे
दाभाडी गावात आज पाण्याची गंगा आली; यापुढे विकास गंगा वाहील : कृषिमंत्री दादाजी भुसे
दाभाडीत विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
मालेगाव, दि. 28 (युगनायक न्युज नेटवर्क) : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत तळवाडे धरणाच्या पाणीपुरवठा योजनेतून दाभाडी गावात आज पाण्याची गंगा आली आहे, येथून पुढे विकासाची गंगा वाहील, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
तालुक्यातील दाभाडी येथे तळवाडे धरणाच्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण व विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी प्र.सरपंच सुभाष नहिरे, जि.प.सदस्य संगिता निकम, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.
शासनाच्या वर्षपूर्ती निमित्त विविध विकास कामांच्या शुभारंभासह लोकार्पण करताना विलक्षण आनंद होत असल्याचे सांगत मंत्री श्री.भुसे म्हणाले. 12 गाव पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करताना विशेषत: महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून वचनपूर्ती झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज भूमिपूजन केलेली सर्व कामे दर्जेदार पध्दतीने झाली पाहिजे असे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. पुढील वर्षभरात गावातील विकास कामांमुळे गावाचा नक्कीच विकास होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर गावातील अतिक्रमितांची घरे नियमानुकूल करण्याचे आवाहन करत गावातील गट शेतीच्या माध्यमातून शेतमालासाठी गोडावून व कोल्ड स्टोरेजच्या निर्मितीसाठी मोठा निधी उभारण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीमुळे शासनावर आलेल्या आर्थिक संकटातही कर्जमाफीच्या अनुषंगाने बळीराजाला दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम शासनामार्फत झाल्याचे सांगत मंत्री श्री. भुसे म्हणाले, अवकाळी व सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने भरीव निधी उभा करून बळीराजाच्या पुनर्वसनासाठी शासनाने चांगली मदत केली आहे. राज्यातील एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी 5 रुपयात शिवभोजनाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात आली आहे. आदिवासी बांधवांसाठी खावटी कर्ज माफीचा निर्णय घेऊन यापुढे कर्ज नाही तर अनुदानापोटी निधी वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्याला विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक पानी अर्जाची सोय करून शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विकेल ते पिकेल योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासह महिला शेतकऱ्यांनाही सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री श्री.भुसे यावेळी म्हणाले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME