विनायकदादा पाटील यांच्या निधनामुळे बहुआयामी नेतृत्व हरपले – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई, दि. २४ : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, लेखक, वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. राजकीय, सामाजिक, कृषी, सहकार क्षेत्रात विनायक दादा यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली होती. शेती, माती, संस्कृतीसाठी सतत कार्यरत असणाऱ्या विनायकदादा पाटील यांच्या निधनाने बहुआयामी नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
विनायकदादा पाटील यांनी सरपंच म्हणून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर पंचायत समिती सभापती, आमदार आणि मंत्री असा त्यांचा चढता राजकीय आलेख राहिला. राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांनी उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आदी खात्यांची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. वनशेती हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक होते. जेट्रोफा या वनस्पतीची तंत्रशुद्ध शेती त्यांनी यशस्वीपणे करुन दाखवली. वनशेतीतील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि वनश्री तर भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निधनाने अनुभवी तसेच दूरदृष्टीचा नेता काळाच्या पडद्याआड गेला. विनायकदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे श्री. थोरात म्हणाले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME