ऑक्सिजन, बेडस् आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही याची काळजी घ्या – पालकमंत्री छगन भुजबळ

 




ऑक्सिजन, बेडस् आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही याची काळजी घ्या – पालकमंत्री छगन भुजबळ



नाशिक,दि. २५ सप्टेंबर (जिमाका वृत्त) जिल्ह्यात उपलब्ध असलेली रेमडिसिव्हरची इंजेक्शन रूग्णांना वेळेत व वाजवी दराने मिळतील याची दक्षता घ्यावी. रेमडिसिव्हरचा पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच त्याचा किती साठा उपलब्ध आहे याबाबत प्रत्येक रुग्णालयाबाहेर बोर्ड लावण्यात यावा. जास्तीत जास्त रेमडिसिव्हरचासाठा शासकीय रुग्णालयाच्या औषध विक्री केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्याच्या सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

 

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्याची आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.  जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीत पालकमंत्री श्री.भुजबळ बोलत होते.

 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सिमांतीनी कोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, रुग्णसंख्या मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घट होत असली तरीदेखील भविष्यातील संभाव्य वाढ विचारात घेता ऑक्सिजन, बेड्स आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

 

 गर्दीच्या ठिकाणी मार्केटच्या ठिकाणी जनजागृती व प्रसिद्धीवर भर देण्यात यावा

कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत शासन-प्रशासनास स्वस्थ बसता येणार नाही. मुंबईतील केईएमच्या धर्तीवर नाशिकमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी अद्ययावत महापलिकेमार्फत रुग्णालय तयार करण्यास प्राधान्य देण्यात यावे. ऑक्सिजन टॅन्क लवकरात लवकर बसविण्यात यावेत. तसेच याबाबत काय कामे झाली याची पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात येईल असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

 

शहर जिल्ह्यातील मृत्युदर आटोक्यात राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. येवला उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सर्व सुविधा व व्यवस्था पूर्ण करण्यात याव्यात असे सांगून पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात ६८८२९ कोरोनाग्रस्त त्यातील ८८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. १०८१८ वरून ३ हजाराने जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली आहे. देशात आणि राज्यातील मृत्यूदरा पैकी नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी मृत्युदर आहे. शून्य मृत्युदर करण्यासाठी प्रशासन काम करत आहेत.

 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत देखील प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसात प्रयत्नपूर्वक नवीन क्षमता निर्माण केली आहे व सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत नाही. सर्वसामान्य नागरिकांना सहजतेने माहिती उपलब्ध होण्यासाठी औषध उपलब्धते बाबत प्रचार प्रसार करण्यास प्राधान्य देण्यात यावे. प्रत्येक रुग्णालयाबाहेर बेड्स आणि औषध साठ्याबाबत  बोर्ड लावण्यात यावेत व यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. तसेच मेडिक्लेमच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी  राज्यस्तरावर नेण्यात येऊन सोडविण्यात येतील, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज आहेर आदींनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील एकंदरीत व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.  महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील माहिती सादर केली.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू