वेळेत निदान, उपचारामुळे अत्यावस्थ महिला झाली कोरोनामुक्त • वाशिम कोविड रुग्णालयात यशस्वी उपचार
वेळेत निदान, उपचारामुळे अत्यावस्थ महिला झाली कोरोनामुक्त
• वाशिम कोविड रुग्णालयात यशस्वी उपचार
वाशिम, दि. २८ (जिमाका) : येथील जिल्हा कोविड रुग्णालयात एक महिन्यापूर्वी अत्यावस्थ स्थितीत दाखल झालेली रिसोड शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. वेळीच निदान होवून तातडीने उपचार मिळाल्यास कोरोना संसार्गावर मात करता येते, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी कोणतीही भीती न बाळगता, दुखणे अंगावर न काढता त्वरित आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये कोरोना बाधित आढळलेल्या रिसोड शहरातील ६५ वर्षीय महिलेला २५ ऑगस्ट रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर महिलेची तब्येत खालावली असल्याने तसेच तिला स्वतः श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येत असल्याने व्हेंटिलेटरच्या सहाय्याने कृत्रिमरीत्या ऑक्सिजन देवून तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले, मात्र रुग्णाचे शरीर उपचारासाठी अपेक्षित प्रतिसाद देत नव्हते. तरीही कोविड रुग्णालयातील वैद्यकीय चमूने आपले प्रयत्न अथकपणे सुरूच ठेवले.
११ सप्टेंबर पर्यंत सदर महिलेला व्हेंटिलेटरच्या सहाय्याने ऑक्सिजन द्यावा लागत होता. त्यानंतर हळूहळू तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली. दरम्यानच्या काळात आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन वेळा तिच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले, मात्र ते पॉझिटिव्ह आले. तिला कोरोनामुक्त करण्यासाठी वैद्यकीय चमूचे प्रयत्न अथकपणे सुरूच होते. अखेर २७ सप्टेंबर रोजी सदर महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच कोरोना संसर्गाचे निदान झाल्याने जिल्हा कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांना यश आले. सदर महिला कोरोनामुक्त झाल्यानंतरही तिच्या इतर आजारावर उपचार सुरु असल्याने तिला नॉन-कोविड वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
लक्षणे दिसताच तातडीने चाचणी करून घ्या !
परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच कोरोना संसर्गाचे निदान झाल्याने आणि योग्य उपचार मिळाल्याने अनेक अत्यावस्थ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा दुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडाची चव जाणे, अशक्तपणा येणे यासारखी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच नागरिकांनी कोरोना विषयक चाचणी करून घ्यावी. सध्या महामारीचा काळ असून दुखणे अंगावर काढणे आपल्या जीवावरही बेतू शकते, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME